यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•एम.डी.कॉलेज (परळ)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•गुरु नानक कॉलेज (माटुंगा)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•गर्व्हमेंट पॉलिटेक्निक (वांद्रे)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•विवा कॉलेज (विरार)
•एस. एस जोंधळे पॉलिटेक्निक (आसनगाव)
•डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी (पनवेल)
सुवर्णमध्य साधण्याची गरज
मुळात संप पुकारण्याचा उद्देशच सामान्य माणसांना ओलीस ठेऊन आपल्या मागण्या मान्य करून घेणं असा झालाय. अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत संप पुकारला की, त्यामुळे लोकांना त्रास होणार मग जनता पेटून उठणार आणि सरकार आपल्या मागण्या मान्य करणार असं समीकरण झालंय. म्हणजे कुठेतरी परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातो. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर संप पुकारणाऱ्यांची बाजू जरी बरोबर असली तरी मार्ग चुकतोय. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संप हेच अस्त्र न वापरता इतरही मार्ग शोधावेत. सरकारनेही अशा तक्रारी आणि मागण्या यांची योग्य वेळी दाखल घेतली तर प्रकरण चिघळणार नाही. तसंच सेवा पुरवणाऱ्यांना जनतेनेही सन्मानाने वागवायला हवं. इतर पर्यायी संघटनांनी संपाकडे स्पर्धा किंवा संधी म्हणून न पाहता सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे. इतर कशाहीपेक्षा रुग्ण आणि त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात या बाबतीत सर्वांचेच प्रबोधन व्हावं आणि सुवर्णमध्य साधला जावा असं मला वाटतं.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच
गेल्याच आठवड्यात घडलेल्या डॉक्टरांच्या मारहाणीच्या प्रकारावरून पुन्हा एकदा डॉक्टरांनी स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न उचलून धरला. पण अशावेळेला ते स्वतः मात्र स्वतःच कर्तव्य विसरून गेले, कोणास ठाऊक त्या काळात किती निरपराध जीव गेले असतील. त्या सर्वांची जबाबदारी कोण घेणार? समाजातील कोणत्याही घटकावर जर अन्याय होत असेल तर त्यावर बंद किंवा संप हा उपाय असूच शकत नाही. डॉक्टर हा समाजातील अगदीच महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या संपाने समाजावर खूप मोठा वाईट परिणाम झाला. असं असलं तरीही एका बाजूने विचार करता, डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्याचे डॉक्टरांवरील हल्ल्यांचे वाढलेले प्रमाण अगदी चिंतेची बाब आहे. त्यामुळे हे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलायला हवी.
निखिल नार्वेकर, साठ्ये कॉलेज
...तर एकमत होणं अशक्य
सर्व प्रथम डॉक्टरांना मारहाण, त्यांनी पुकारलेला संप आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेली दमदाटी या सर्व प्रकारामुळे आज त्याची झळ सर्वसामान्यांना भोगावी लागत आहे. आपण जर एकमेकांच्या चुका काढण्यात वेळ घालवला तर समाजात एकमत होणं अशक्य होईल आणि जर एकमत नसेल तर ही परिस्थिती अधिकाधिक चिघळणार. डॉक्टर नेहमीच रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांच्याकडून हलगर्जीपणा होतो तेव्हा मारहाण, जीव घेणं हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. डॉक्टरांनी रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुवरणं आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संयम व विश्वास ठेवणं गरजेचं आहे. रिक्षा-टॅक्सी, बस-सफाई कामगार यांच्या बाबतीतही असंच वाटतं की कधी प्रशासन मुजोरपणा करतं तर कधी रिक्षा-टॅक्सी चालक बेजबाबदारपणे व्यवहार करतात. असे काही प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनानेही कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि प्रश्न सोडवले पाहिजेत.
योगेश जगदाळे, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक
मार्ग अयोग्यच
डॉक्टरांनी जो संप केला होता तो त्यांनी त्यांच्या सुरक्षतेवर बोट दाखवत केला होता. त्यांना हे असं करण्याची गरज का भासली. डॉक्टरांना सुरक्षा देणं ही सरकारची जबाबदारी आहे. जे लोकांचे प्राण वाचवतात त्यांनाच आज आपला प्राण मुठीत धरून काम करावं लागतंय. पण एकीकडे दिवसेंदिवस डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत चाललीय. गैरव्यवहार, गैरवर्तवणुक यात आज अनेक डॉक्टर अडकले आहेत. एकंदरीत डॉक्टरांना तर सुरक्षा दिली पाहिजे, पण त्यांनीही सुरक्षितता मिळवण्यासाठी जो मार्ग अवलंबला तो अगदी अयोग्य होता असं मला वाटतं. या अशा संपामुळे डॉक्टरांची प्रतिमा अधिक मलीन होते. अशा या आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या डॉक्टरांना निलंबित केलं पाहिजे. तसंच यापुढे लोकांनीही डॉक्टरांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. जो लोकांचे प्राण वाचवतात त्यांनाच मारहाण करणं कधीच क्षम्य नाही, हे लोकांनी जाणलं पाहिजे.
कार्तिक जाधव, गुरु नानक कॉलेज
सामंजस्याने परिस्थिती हाताळावी
अत्यावश्यक यंत्रणांच्या संपामध्ये भरडला जातो तो सर्वसामान्यच. या वेळी झालेल्या डॉक्टरांच्या संपात राज्यभरातून जवळपास ३७७ रुग्ण दगावल्याचा अंदाज आहे. कोणाच्यातरी हट्टापायी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. मुळातच अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणाऱ्या यंत्रणांनी काही समस्या असल्यास थेट संपावर न जाता इतर पर्यायाचा विचार करायला हवा. एकंदरीत या सर्व प्रकाराला शासकीय रुग्णालयातील एकूणच दुरावस्था आणि डॉक्टर- रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील संवादाचा अभाव या गोष्टी कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षात वैद्यकीय सेवेचे झालेले बाजारीकरण पाहता सर्वसामान्यांच्या मनात एकूणच यंत्रणेबद्दल विश्वासार्ह्यता कमी झालीय. यातूनच अशा प्रकारचे हल्ले होतात. त्यामुळे सामंजस्याने ही परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे.
अभिषेक नकाशे, एम.डी.कॉलेज
डॉक्टरांचं काय चुकलं?
डॉक्टरांचं आयुष्य किती खडतर आहे हे वेगळ्याने मांडायची गरज नाही. अशिक्षित लोकांसोबत भावनेच्या भरात सुशिक्षित लोकही चुकीची पाऊले उचलतात. एखाद्या वेळेस तातडीने रुग्ण आला तर आपल्या परिवाराचा विचार न करता सगळं सोडून दवाखान्यात येतात, हे आपल्या लक्षात का येत नाही? डॉक्टर आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतात. पण जर त्यांना अपयश आलं तर अशी मारहाण करणं आणि हे त्यांनी सहन करणं हे कितपत योग्य आहे? त्याविरुद्ध डॉक्टरांनी संप केला ते पण आपली बाजू मांडण्यासाठी तर काय चुकलं! या सगळ्या गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
धनश्री मांडके, डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी
सामोपचाराने प्रश्न सोडवावेत
डॉक्टर हा सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणींच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला होता. डॉक्टरांना मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारणं हे सुद्धा अयोग्यच आहे. अनेक अत्यावश्यक सेवांच्या बाबतीतसुद्धा या गोष्टी अनुभवायला मिळतात. हल्ली अनेक ठिकाणी संपाचा वापर शस्त्र म्हणून केला जात आहे. मुळात संपाच्या वेळी सर्वात जास्त त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होतो. या गोष्टी निश्चितच टाळता येऊ शकतात. यासाठी सामान्य नागरिक आणि अत्यावश्यक सेवा यात उत्तम संबंध प्रस्थापित व्हायला हवेत. तसंच अशा घटना घडल्यास मारहाण किंवा संप न करता सामोपचाराने आणि एकत्र येऊन त्यातून मार्ग काढायला हवेत. नियमांचे योग्य प्रकारे पालन झालंच पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज
तेही सर्वसामान्यच!
कुठलीही कार्यरत संघटना संपावर गेली की, त्याची झळ सर्व सामान्य माणसाला बसल्याशिवाय राहत नाही. संपांमुळे पूर्ण समतोलच बिघडतो. प्रवासाचे, वैद्यकीय मदतीचे, व्यवाहारांचे सगळ्यांचेच वांदे होतात. मग जी संघटना बंड पुकारते त्यांच्या विषयी आपण नाराजी व्यक्त करतो आणि टिकाही करतो. पण आपण कुठेतरी हेही विसरतो की, जे संपावर जातात तेही सर्व सामान्य माणूसच आहेत. आपल्याप्रमाणे त्यांच्याही समस्या असतात. परिस्थिती त्यांच्या जीवावर बेतत असेल तर त्यांना अशी पाऊलं ऊचलावी लागतात. हे सगळं टाळण्यात सरकार मोठं योगदान करू शकतं. प्रत्येक संघटनेला योग्य तो मोबदला आणि आवश्यक सुरक्षा दिली तर असे प्रसंग उद्भवणार नाही.
मधुरा गावडे, डहाणूकर कॉलेज
संप- एकमेव मार्ग नव्हे
डॉक्टरांवर गेल्या काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्या विरोधात संपूर्ण राज्यभर संप पुकारण्यात आला. या संपामुळे खूप रूग्णांचे हाल झाले. एखाद्या रूग्णाचे हाल होणं फार चुकीचं आहे. डॉक्टरांवर बऱ्याच वेळा हल्ला होतो. पण नेमकं कोणाचं चुकतं याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. प्रसाशनसुद्धा या हल्ल्याबद्दल तेवढंच जबाबदार आहे. शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचं येथे समजतं. नातेवाईकांनीसुद्धा थोडा विचार करायला हवा. डॉक्टरांवर हल्ला झाला ते अयोग्यच आहे. पण त्याची शिक्षा इतर रूग्णास का? अशा वेळेस सरकार मात्र आपली राजकीय पोळी भाजतंय. पुन्हा आश्वासन देण्यात आलंय की, सुरक्षा यंत्राणांमध्ये वाढ करू. पण हे आश्वासन कधीपर्यंत पूर्ण होईल याची काही शाश्वती नाही.
अनिरुद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज
दोषींवर कारवाई व्हावी
अजारी पडल्यावर देवाच्या आधी आपण ज्याला शरण जातो तो म्हणजे डॉक्टर. पण आज डॉक्टरांवरील होणारे हल्ले ही लाजीरवाणीबाब आहे. सरकारने त्वरित पावलं उचलून दोषींवर कारवाई करावी आणि डॉक्टरांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी. जेणेकरुन अशा घटना घडणार नाहीत आणि डॉक्टरांनाही सुरक्षेचं वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. कोणताही डॉक्टर रुग्ण बरा व्हावा, म्हणून शंभर टक्के प्रयत्न करत असतो. पण कधी-कधी रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाही आणि तो दगावतो तेव्हा डॉक्टरांना दोष देणं, हे चुकीचं आहे. म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली मानसिकता बदलायला हवी आणि डॉक्टरांना सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारावी.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज
डॉक्टर अविभाज्य घटकच
गेल्या आठवड्यातच वडिलांच्या ओळखीने हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी मिळाली. त्याप्रमाणे मी शिक्षणासोबत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी कामावर हजर झालो. तिथं गेल्यावर कळलं की, डॉक्टरांचा संप आहे. तिथं दोन-चार जणांना विचारल्यावर समजलं की, डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली. कारण डॉक्टरांनी रोग्णाच्या जीवाची योग्य ती दखल घेतली नाही, त्यामुळे त्याचा जीव गेला. मारहाणीमुळे डॉक्टरांनी संप पुकारणं यात त्यांचं काही चुकलं मुळीच नाही. तर डॉक्टरांनी जे केलं त्यात काही गैर नाही, असं मला वाटतं. सर्वप्रथम डॉक्टरांवर हल्ला व्हायला नको होता. आपण डॉक्टरांना देव समजतो. त्यात मी तर जास्तच कारण पाच वर्षांपूर्वी जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा मला डॉक्टरांनीचा मृत्यूच्या दारातून आणलं. रुग्णांनी डॉक्टरांकडून अति अपेक्षा ठेवू नयेत. डॉक्टरांना आपण देव समजत असलो तरी समजणं आणि असणं यात फरक असतोच. डॉक्टर हे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असतात. त्यांच्यावर अशा मारहाणीचे प्रकार होणं चांगलं नाही.
अभिषेक टुकरूल, विकास रात्र कॉलेज
संपाचं नवं शस्त्र
सामान्य नागरिकांच्या काय गरजा आहेत? हे जाणून न घेता कोणतीही संघटना आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी संपाचं शस्त्र बाहेर काढतं. पूर्वी अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी होणारे संप आता कोणत्याही किरकोळ गोष्टीसाठी होऊ लागलेत, हे मोठं दुर्देवच. डॉक्टरांच्या संपात किमान २०० लोकांचा उपचार अभावी मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. या २०० लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, संपकारी डॉक्टर या प्रश्नाचं उत्तर देतील का? का सरकारने डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये? मी असं म्हणत नाही की, पूर्णपणे डॉक्टर चुकीचे आहेत. पण डॉक्टर लोकांच्या मनातील आपला विश्वास गमावत चाललेत. सरकारनेसुद्धा अशा संपाची वेळीच दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी. समस्या सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करावा. याच बरोबर चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी आणि शांततेला बाधक ठरणाऱ्या गोष्टीवर नियंत्रणात आणाव्यात.
अंकुश चुरी, मुंबई विद्यापीठ
संप डॉक्टरांचा, हाल रुग्णांचे
गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांच्या बेमुदत सामुहिक संपामुळे सार्वजनिक रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग सलग चौथ्या दिवशी बंद राहिला. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारांकरिता नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागले. व्यवस्थेतील दोषाचा परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे, ही सर्वस्वी जबाबदारी तेथील स्थानिक पोलिसांची आहे. सरकारला हे सांभाळता येत नसेल तर त्यांनी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक प्रत्येक रुग्णालयात द्यावे जेणेकरून डॉक्टरांना सुरक्षित वाटेल.
रमण जगताप, मुंबई विद्यापीठ
माणूसकी हरवतेय का?
मागचा आठवडा गाजला तो डॉक्टरांच्या संपामुळे, त्यातच सामान्यांच्या गैरसोयीच्या बातम्यांमुळे, त्याचं कारण म्हणजे डॉक्टरांना होणारी मारहाण आणि त्या सगळ्याचा निषेध म्हणून सर्व डॉक्टर संपावर गेले. पण यात भरडला तो सामान्य माणूस! उपचाराभावी खूप लोकांना प्राण गमवावे लागले, अशी माहिती मिळतेय. हे डॉक्टरांच्या बाबतीत नाही तर इतर आवश्यक सेवांबाबतही घडतं. पण या सगळ्यात सामान्य माणूस त्याची झळ सोसतो हे लक्षात कसं येत नाही. हा सगळा प्रकार संतापजनक आहे, असं मला वाटतं. अशा सगळ्या परिस्थितीत सामान्य माणसं वेठीस धरली जातात. हे या लोकांच्या 'गावीही नसतं'. असं वाटतं की, या सगळ्यांमधली माणूसकी हरवतेय का? मला वाटतं की, यासागळ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी. जेणेकरून सामान्यांचे हाल होणं थांबेल.
वैष्णवी सुर्वे, जोशी-बेडेकर कॉलेज
डॉक्टरांनी कर्तव्य विसरु नये
मागचा आठवडा गाजला तो डॉक्टरांच्या संपामुळे. याच संपामुळे देशभर सर्वत्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. खरं पाहिलं तर हल्ला हा एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून झाला. पण जे निरपराध रुग्ण उपचारा अभावी दगावले त्याला जबाबदार कोण? डॉक्टरांवर हल्ले होऊ नये, हे आमचंही मत आहे. जर डॉक्टर उपचारात हलगर्जीपणा करत असतील तर त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती. कायद्याचा वचक न बाळगता असे हल्ले करणं अशोभनीय आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनीही आपली मानसिकता बदलावी. उपचारांमध्ये कमतरता जाणवल्यास कायदेशीर मार्ग आवलंबवावा पण असे हल्ले करु नये. डॉक्टरांनीपण आपलं कर्तव्य विसरु नये. पुन्हा कधी असे संप करु नका आणि सामान्य जनतेला वेठीस धरु नका.
किशोर धानके, एस. एस जोंधळे पॉलिटेक्निक
अशोभनीय प्रकार
डॉक्टरांनी त्यांचं 'प्राथमिक कर्तव्य' बाजूला ठेऊन संप पुकारणं हे त्यांच्या कार्याला शोभत नाही. विचार करण्याजोगी गोष्ट आहे, संप पुकारल्यानंतर कितीतरी आजारी व्यक्ती, गरोदर स्त्रिया अत्यंत नाजूक अवस्थेत असतील तर त्यांच्या जीवाच काय झाल असेल? या प्रकरणात चूक कोणाचीही असो पण भोगावं त्या निष्पाप रुग्णांना लागलं. हक्कांसाठी लढत असताना आपण कोणाचा तरी जीव टांगणीला टाकला नाही ना? याचा विचार व्हायला हवा. तसंच रुग्णांच्या नातेवाइकांनी समजून घेऊन जर वागलं तर पुढील सर्व धोका, समस्या टाळता येतील.
प्रणित समजीसकर, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक
चूक कोणाची?
कॉलेजांमध्ये प्रवेश घेणं असो किंवा मग राशनच्या दुकानातील अरेरावी असो..जिथे शाशकीय काम येतं तिथं सामान्य माणसाला मन:स्ताप सहन करावाच लागतो. सामान्य जनतेने डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यावर डॉक्टरांनी पुकारलेला संप ही खरतर एक गंभीर बाब आहे. पण मला वाटतं यात दोघांची ही चूक नाही. या सर्व परिस्थितीत खरं तर आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची आणि यंत्रणेची चूक आहे. यावर उपाय म्हणजे रुग्णांच्या गर्दीनुसार डॉक्टरांची संख्या वाढवावी. योग्य त्या आणि मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा पुरवाव्यात, व्यवहारातील ढसाळपणा, भ्रष्टाचार पूर्णतः नष्ट करावा.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स
अधिक सक्षम यंत्रणा असावी
डॉक्टरांवर झालेली मारहाण आणि त्यामुळे त्यांनी पुकारलेला संप या सगळ्यामध्ये चूक कोणाचीही असो सामान्य माणूसच भरडला जातो. म्हणूनच नागरिकांनीसुद्धा कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करू नये. कारण यासर्वांचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात. रिक्षा-बस- टॅक्सी चालकांचा संप असो किंवा सफाई कर्मचाऱ्यांचा संप असो झळ ही सर्वसामान्य नागरिकांनाच पोहोचते. यासाठी सरकारनेदेखील ठोस पावलं उचलायला हवीत. प्रशासन यंत्रणा सक्षम करायला हवी.
कांचन गावस्कर, एच. आर कॉलेज
चुक शोधण्यापेक्षा माणुसकी शोधा
दरम्यानच्या काळात घडलेल्या सर्व प्रकाराचा आपण नीट विचार केला तर दोघांचीही चुकी आहे असं म्हणता येईल. काही व्यक्ती आपल्या राजकीय पदाच्या जोरावर तर काहीजण पैशांच्या जोरावर डॉक्टरांवर दादागिरी करून डॉक्टरांवर मानसिक दबाव आणतात. तसंच काहीजण डॉक्टरांवर हातही उगारतात, हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. त्यामुळे अशा या डॉक्टरांच्या संपावर जाण्याच्या गोष्टीला अनेकदा अशा दादागिरी करणाऱ्या व्यक्तीही जबाबदार ठरतात. पण डॉक्टरांनी ही आपली जबाबदारी पूर्ण करणं आवश्यक आहे आणि थोडी फार माणुसकी जपणं आवश्यक आहे.
अक्षय अनभवणे, विवा कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट