व्हिडिओ काढणंही चुकीचंच रिक्षामध्ये जे अश्लील चाळे सुरू होते ते कृत्य अयोग्यच आहे. त्यांनी नागरी भान जपलं नाही हे मान्य. परंतु सर्वच तरुण तरुणी असे वागतात असं आपण म्हणू शकत नाही. आता उरला प्रश्न तो व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचा. जर त्या रिक्षात अश्लील चाळे करणं चुकीचं होतं तर तो व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल काढणारी व्यक्ती देखील चुकीची आहे. आजकाल कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर टाकणं ही एक फॅशन, ट्रेंडच झाला आहे. परंतु या ट्रेंडबरोबर चालत असताना आपण सामाजिक भान राखतोय का याचा विचार करायला हवा. भक्ती गुरव, साठ्ये कॉलेज सर्वांनाच दोष नको व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हल्ली खूप वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जातात. शेरोशायरी, चांगले विचार याबरोबरच नको ते व्हिडिओही पसरवले जातात. यावरुन एकूणच सगळ्या तरुण पिढीला टार्गेट केलं जातं. कुठे काय वागायचं काय बोलायचं हे त्यांना कळत नाही अशी वक्तव्यं केली जातात. पण, सर्वांनाच दोषी मानणं बरोबर नाही. आपल्याला समाजामध्ये वावरत असताना समाजानं बांधलेल्या एका चौकटीत राहावं लागतं. त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे वागावं लागतं. सध्याचं जग हे झपाट्यानं बदलत चाललं आहे. सोशल मीडियासारख्या वेगवेगळ्या माध्यमांचा परिणाम आपल्यावर मोठ्या प्रमाणावर होत असतो. हा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे हे देखील त्याच्याशीच निगडित एक उदाहरण आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना जे नागरी भान आपल्याला ठेवायला हवं ते कुठेतरी सुटत चाललं आहे. अशी बरीचशी जोडपी बघत असतो ज्यांच्याकडे पाहताना आपल्याला लाज वाटते. त्यांचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणाऱ्या मानसिकतेचं काय? कुणाच्या परवानगीशिवाय त्याचा फोटो काढणं किंवा व्हिडीओ क्लिप तयार करणं हेही चुकीचंच आहे. म्हणजे प्रत्येकानंच समाजात नागरी भान राखून राहीलं पाहिजे. व्हिडिओ काढून तो पसरवणाराही तेवढाच चुकीचा आहे. शिक्षा झाली तर ती यातल्या दोघांनाही व्हायला हवी. अंजली रोडत, साठ्ये कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट