यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•विल्सन कॉलेज (गिरगाव)
•बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज (ग्रँट रोड)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•रामानंद आर्य डी.ए.व्ही.कॉलेज (भांडुप)
•जोशी-बेडेकर कॉलेज (कल्याण)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•जीवनदीप कॉलेज (गोवेली)
•यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कर्जत)
कलचाचणी घ्यावी
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त गुण असतात, कला असतात. पण त्याची हुशारी मात्र साचेबद्ध परीक्षांमधील टक्केवारीवरूनच ठरवली जाते. मग ज्यात रसच नाही त्यात यश मिळत नाही आणि मग ताणतणाव आणि पुढचे प्रकार सुरु होतात. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची लहानपणापासूनच कलचाचणी म्हणजेच अॅप्टीट्यूड टेस्ट घेणं आवश्यक आहे. पण अशाप्रकारे स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळाल्यावर मात्र त्याचं सोनं करणं आणि त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणं हे विद्यार्थ्यांचंच कर्तव्य आहे. कारण मेहनत करणं, हे कोणत्याही क्षेत्रात अटळ आहे. शिक्षण संस्थेने टक्क्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी तुलनात्मक गुणदान पद्धत म्हणजे रिलेटिव्ह मार्किंग स्किम आणि ग्रेडिंग सिस्टिमचा उपयोग करावा. विद्यार्थ्यांना ग्रेड्स दिल्यास एकेका मार्कासाठी होणारी स्पर्धा कमी होण्यास मदत होईल.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय
जीवघेणी स्पर्धा नको
परीक्षा म्हणजे उफ टेन्शनची भरती आणि त्यानंतर लागणारा निकाल म्हणजे ओहोटी. अगदी बालवाडीपासून पदवीपर्यंत अशा अनेक परीक्षा आम्ही देतो फक्त भविष्य घडवण्यासाठी. पण एक कागदावरील मार्कांची कुंडली खरंच आपलं भविष्य घडवेल का? स्पर्धा, गुण, गुणवत्ता यादी यावर मुलांचं भविष्य असतं असं कोण म्हणतं? नोकरीला लागल्यावर दहावी बारावीच्या मेरिट लिस्टला कोणी विचारतदेखील नाही. विद्यार्ध्यांमध्ये असलेले संवाद कौशल्य आणि सुविचार याच्याच आधारावर नोकरीसाठी निवड होते. भविष्यात सगळेच कोणत्या न कोणत्या क्षेत्रात चांगलीच छबी उमटवतात. परीक्षेला मेरिट अन् बोर्डचं स्वरूप दिल्याने मुलांची अजून गोची होते. ज्ञान राहिलं बाजूला, गुण मिळवण्यासाठी धडपड केली जाते. परीक्षा आपल्यातील गुणांची आकडेमोड ठरवते, भविष्य नाही. मला असं वाटतं की, परीक्षा भीती नाही तर ज्ञानाची गती वाढवणारी हवी. स्पर्धा सुदृढ हवी, जीवघेणी नको. फक्त गुणांची गुणपत्रिका नसून ज्ञानाची पत्रिका असावी.
विभक्ती साळवी, डहाणूकर कॉलेज
...तर परीक्षेचं गांभीर्य राहणार नाही
विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यांच्या मार्क्सनुसार मेरिट लिस्ट लावली जायची. टक्क्यांची ही जागा आता ग्रेडने घेतल्यामुळे आता ही स्पर्धा कमी झालीय. मला वाटतं ही मार्क्स आणि ग्रेडची चढाओढ कमी करायची असेल तर निकालावर फक्त पास आणि नापास असे दोनच शेरे नमूद असावेत. शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात कसल्या ही प्रकारची ढील देऊ नये. अन्यथा परीक्षेचं गांभीर्य विद्यार्थ्यांना राहणार नाही आणि भविष्यातील कठीण परिस्थितीला तोंड देणं त्यानं अवघड जाईल. निकालानंतर महत्त्वाची भूमिका बजावणारे म्हणजे पालक. पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करूनच त्यांच्याकडे अपेक्षा कराव्या. स्पर्धेची भावना, भविष्याची भीती दाखवून त्यांच्यावर अभ्यासाचा दबाव आणू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची तुलना इतर विद्यार्थ्यांसोबत करू नये. असं केल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील निकालाची भीती निघून जाईल.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स
तुलनेचे बळी
माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासात म्हणा किंवा इतर क्षेत्रात प्रगती करण्यासाठी इतरांशी स्वतःची तुलना करूच नये. नेहमी प्रत्येकाने स्वतःच्या भूतकाळातील कामाशी तुलना करून स्वतःची प्रगती करावी. यामुळे त्या विद्यार्थ्यांची प्रगती तर होतेच तसंच परीक्षा या जीवघेण्या नाही, हे त्यांना उमजेल. इतरांशी तुलना केल्याने फक्त आणि फक्त स्पर्धात्मक वातावरण राहतं. शिक्षण आणि करिअर निवड या गोष्टी एकमेकांवर जरी अवलंबून असल्या तरी शिक्षण विभागाने सर्व जातीतील विद्यार्थ्यांना समान हक्क दिले पाहिजे. असं झालं तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थी करिअरची अचूक निवड करू शकेल.
ज्ञानाच्या मंदिरामधून सुरु होते आयुष्याची पहाट,
याच मंदिरामधून घडत जातो व्यक्ती सुसाट,
स्पर्धात्मक जीवनापलिकडेही आहे एक सुंदर आयुष्य,
या शिक्षणाच्या वाटचालीला जो जाणतो तोच खरा शिष्य,
असे हे शिक्षणाचे महत्त्व थोर अनमोल,
जो जाणतो त्याचाच ठरतो खास रोल
प्राजक्ता भरगुडे, गुरु नानक खालसा कॉलेज
शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक
शिक्षाण पद्धतीत गेल्या काही काळामध्ये काहीच बदल झालेले नाही. आजच्या घडीला बहुतेक विषय हे कालबाह्य झालेत. ही शिक्षण पद्धती अवलंबण्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. मार्कांचं महत्त्व जरी कमी झालं तरी ग्रेड बद्दल आता धाकधुक असते. त्यामुळे करिअर निगडीत कोर्स चालू करावेत. जेणेकरून प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचं शिक्षण आणि करिअर निवडताही येईल आणि त्यांना कोणत्या गोष्टीचं दडपणही राहणार नाही. संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये बद्दल होणं आवश्यक आहे. आज आपण डिजिटल इंडियाचा नारा मिरवतो, मग आपणही या डिजिटल शिक्षणाचा भाग बनूयात आणि आपलं करिअर छान घडवूयात.
अनिरूद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज
स्पर्धा अटीतटीची
परीक्षेतील टक्क्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच बोर्ड आणि विद्यापीठांनी मेरिटची पद्धत बंद केली खरी पण त्यानंतरही मार्कांची ही स्पर्धा काही कमी झालेली नाही. महात्मा गांधी म्हणालेले की, शैक्षणिक संस्था अशी असावी की ज्याने विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आपल्या शिक्षण पद्धतीनुसार आकड्यांवरून मुलांची गुणवत्ता ठरवली जाते. त्यात अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूपसारखं बदलतं. स्पर्धा अटीतटीची असल्यामुळे आपल्या पाल्याने खूप मार्क मिळवावेत, असं प्रत्येक पालकाला वाटतं. मुलांनी आणि पालकांनी हे समजून घ्यायला हवं की, अभ्यासात कमी मार्क मिळाले म्हणजे त्या मुलाचं काहीच होऊ शकत नाही असं नाही. जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेत त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांना न हिणवता त्यांची मदत केली पाहिजे. आपली शिक्षण पद्धती अशी असली पाहिजे जेणेकरून मुंलांना कळेल की नक्की त्यांना कशात रूची आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांच करिअर घडवू शकतील.
मधुरा गावडे, डहाणूकर कॉलेज
स्पर्धा दिवसागणिक वाढतीय
स्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच बोर्ड आणि विद्यापीठांनी मेरिटची पद्धत बंद केली आहे. पण असं असलं तरीही आजच्या या काळात नवनवीन अभ्यासक्रम (कोर्सेस) उदयाला येतायत आणि हे अभ्यासक्रम विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातायत. अभ्यासक्रमाच्या वाढत्या संख्येमुळे स्वतःचा टिकाव लागण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांमध्ये मार्कांसाठी शर्यत वाढत चाललीय. त्यामुळे खरं तर मेरिटलिस्ट पद्धत बंद झाली असली तरीही निकालांमधील मार्कांची स्पर्धा कमी झालीय का? याचं उत्तर अजूनही नाही असंच आहे. उलट ही स्पर्धा आणखी जास्त वाढलीय. अशी ही जीवघेणी स्पर्धा कमी करण्याचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे विद्यापीठात नव्याने प्रवेश घेणाऱ्या किंबहुना सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देणं हा होय. कारण शालेय जीवनानंतर विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेताना जो अभ्यासक्रम निवडतात त्याबद्दल त्यांच्या पालकांना स्पष्ट व पुरेशी माहिती नसते. त्यामुळे माहितीत असलेला अभ्यासक्रम आपल्या पाल्याने निवडावा असा पालकांचा आग्रह असतो. यामुळे विद्यार्थी संख्या एकाच अभ्यासक्रमासाठी वाढते व स्पर्धा देखील वाढत जाते.
शिवाली चव्हाण, विल्सन कॉलेज
ताण कमी व्हावा
आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. याच स्पर्धेमध्ये कधी-कधी अपयश आल्याने माणूस आपलं जीवन संपून टाकतो. आज शिक्षण क्षेत्रात जरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी जे अपयशी होतात ते जीवाचं काही बरं-वाईट करतात. प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असतं की, आपल्या कुटुंबाला आपल्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या जर तो पूर्ण नाही करू शकला तर तो प्रचंड मानसिक तणावाखाली येतो. हाच तणाव त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. माझ्या मते, जर या आत्महत्या रोखायच्या असतील तर विद्यार्थ्यांनी काही ध्येय ठेवणं आणि त्या दिशेने यशस्वी वाटचाल करणं, गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होतील आणि आत्महत्येसारख्या विचारांपासून दूर राहतील. परीक्षा, निकाल हे पुन्हा-पुन्हा जीवनात येतील, पण एकदा जीवन संपलं तर पुन्हा येणार नाही. त्यामुळे क्षणिक दु:ख देणाऱ्या निकालामुळे आपलं सुंदर असं जीवन संपवू नका.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज
अवाजवी अपेक्षा नकोत!
परीक्षेचा ताण व टक्क्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच बोर्ड व विद्यापीठ प्रयत्नशील आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच तर अनेक वर्षांपासून मेरिट लिस्ट काढण्याची पद्धत बंद करण्यात आली. बेस्ट ऑफ ५ची अनोखी संकल्पना राबवण्यात आली व आता ८० गुणांची लेखी परीक्षा असून उरलेले २० गुण शिक्षकांतर्फे देण्यात येतात. हे सर्वच बदल सकारात्मक असूनही आपण सतत कुठेतरी कमी पडत आहोत, असं मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरण्याऱ्या स्पर्धेचं मुख्य कारण म्हणजे वाढती स्पर्धा व पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी मुलांची झुंज. परीक्षेमुळे आधीच तणावाखाली असलेले विद्यार्थी वाढणाऱ्या अपेक्षांमुळे पार दबून जातात व त्याचं दडपण येतं. ही परिस्थिती अयोग्य आहे व ती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे, असं माझं मत आहे. योग्य मार्गदर्शनाने व सकारात्मक दृष्टिकोनाने हा तिढा नक्कीच सोडवता येईल.
श्रेया जाधव, पोदार कॉलेज
आवडीला प्राधान्य द्यावं
आजकाल सगळीकडे शिक्षणाचा बाजार भरलेला पाहायला मिळतो. कोणत्याही अभ्यासक्रमाचा प्रवेश हा टक्केवारीनुसार दिला जातो. त्यामुळे खरंच ज्यांची पात्रता आहे अशा मुलांना कमी टक्केवारीमुळे आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवता येत नाही. तसंच आजकाल अभ्यासक्रमात बरचसे बदल झालेत. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागतो. आपल्या देशात शिक्षणाचा प्रसार फार कमी प्रमाणात होतो. परिणामी, माहितीच्या अभावामुळे करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणजे कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेत प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त प्रसार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घेऊन अभ्यासक्रम निवडावा व त्यासाठी योग्य तयारी करावी.
अमित पाटील, डहाणूकर कॉलेज
सर्वसमावेशक धोरण आवश्यक
मेरिट लिस्टसारखे अनेक प्रकार बंद करूनही आजही मार्कांची स्पर्धा कमी झालीय, असं म्हणता येणार नाही. पुढच्या काही वर्षांत सर्वसमावेशक, समर्पक शैक्षणिक धोरण येत नाही तोवर ही स्पर्धा थांबेल असं तूर्तास तरी वाटत नाही. अर्थात वाढत्या स्पर्धेने घेतलेले जीव बघता आठवीपर्यंत पाससारख्या पळवाटा आपण काढल्या, पण अंतिमतः त्याचं भयाण वास्तव समोर आलंच. त्यामुळे घोकंपट्टी करून मिळवलेले जास्त मार्क्स नव्हे तर शिकवलेली संकल्पना नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे, ही भावना बालवयातच मुलांमध्ये रूजवायला हवी. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाकडे नेतो, हा जगाचा नियम आहे. त्यामुळे मार्कांची स्पर्धा पर्यायाने जीवघेणी होतेय. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात सक्षम बनवणारं सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण येत्या काळात येणं ही काळाची गरज आहे.
प्रथमेश राणे, रामानंद आर्य डी.ए.व्ही.कॉलेज
विद्यार्थी ज्ञानार्थी नाही, परीक्षार्थीच!
मार्कांची स्पर्धा कमी झालेली नाही, असं मला वाटतं. कारण आजचे विद्यार्थी ज्ञानार्थी नाही तर परीक्षार्थी आहेत. आताच्या या आधुनिक जीवघेण्या स्पर्धेच्या युगात सर्वच एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात शिक्षणाचा खरा अर्थ विसरत चाललेत. ज्ञान तर त्यालाच मिळतं जो मनापासून आपलं ध्येय गाठण्यासाठी मेहनत करतो. उलट काही विद्यार्थी परीक्षेत प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवण्यासाठी किंवा फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण व्हावं, म्हणून अभ्यास करतात. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भरडलेल्या मुलांना कमी गुण मिळाले की लगेच आत्महत्या करतात. पण निकालात मिळालेले गुण याचा मुळात करिअरशी संबंधच नसतो. उदा. कारण जर आपल्याला दहावीला कमी गुण मिळाले म्हणून सायन्स झेपणार नाही याकरता जर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला तर पूर्ण आयुष्यच उलटपालट होईल. म्हणूनच शिक्षण विभागाला फक्त एवढ्याच सूचना द्याव्याशा वाटतात की, जी ही मार्कांची पद्धत आहे, ती या शिक्षण मंडळातून कमी करा. विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनवा. तसंच ज्ञानासोबत इतरही कला, क्रीडा यांनाही वाव मिळेल, या कौशल्यांचा शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करा. म्हणजेच विद्यार्थी सर्वार्थाने परिपूर्ण होतील.
कांचन गावस्कर, एच. आर. कॉलेज
प्रत्यक्ष ज्ञान महत्त्वाचं
वाढत्या स्पर्धेत टिकायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असं लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. पण अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणं नव्हे तर, गुण मिळवणं असे समीकरण रूढ झालंय. शिक्षणातील स्पर्धेमुळे मुलांचं बालपण हरवलंय. पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांचं ओझं वाहताना विद्यार्थी आपलं आयुष्य पणाला लावत आहेत. विद्यार्थ्यांना मानसिक आधाराच्या अभावामुळे अपयश पचवण्याची क्षमता कमी झाल्याचं दिसून येतंय. विद्यार्थ्यांच्या क्षमतांमधील वैविध्य शोधून काढून पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष ज्ञान देणं गरजेचं आहे. असं झाल्यावरच गुण आणि करिअरमध्ये योग्य समन्वय साधता येईल. गुणांच्या स्पर्धेंत यशस्वी झाल्यास यशाचा मार्ग मोकळा होतो हा विचार बदलण्याची, स्वतःकडे असलेल्या कलेचा आदर आणि अभिमान बाळगण्याची, स्वतःचे मूल्यमापन स्वतः जाणून घेण्याची विद्यार्थ्यांना गरज आहे.
विश्रांती शिंदे, विवेक कॉलेज
आवडणाऱ्या विषयांचा समावेश
दप्तराचं ओझ, परीक्षांचा भडीमार आणि अपेक्षांच भार या त्रिकूटात आजचा विद्यार्थी जगताना दिसतो. परीक्षेचं आणि स्पर्धांचं जाळंही इतकं मोठं आहे की, विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठेतून फुरसतच मिळत नाही. स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर या परीक्षेच्या निकालात आपलं नाणं वाजवावचं लागेल, तसं नाही झालं तर आपण अपयशी झालो किंवा दुसऱ्यांच्या तुलनेत आपण कमी लेखले जाऊ हा भ्रम त्यांना होतो. कमी गुण मिळाले म्हणून खचून जाणं किंवा जास्त गुण मिळाले म्हणून भारुन जाऊन फक्त गुणांचा विचार करून आयुष्याची घडी बसवण्यापेक्षा आपल्या कलागुणांचा वेध घेऊन योग्य निर्णय घेणं चांगलंच. स्पर्धेचा आणि परीक्षेचा शेदुंरी लेप चढलेल्या या स्वयंभू मूर्तीतला खरा यशस्वी विद्यार्थी बाहेर काढायचा असेल तर गरज आहे ती पुस्तकी ज्ञानांबरोबर भविष्यास पुरक ठरणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करणं. अभ्यासाच्या भाराने दाबून टाकण्याएवजी आम्हाला आवडणाऱ्या विषयांचा समावेश करावा.
प्रतीक्षा शिंदे, बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज
समज बदलण्याची गरज
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालामुळे 'परीक्षेतील मार्क्स' हा सध्या अत्यंत नाजूक विषय आहे. पालक वर्ग व विद्यार्थ्यांच्या आशा-अपेक्षा, तुलना अशा अनेक बाबी दृष्टीस पडतात. मार्कांविषयीची पालक आणि विद्यार्थ्यांमधली समजूत बदलण्याची गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांला जास्त मार्क्स तो 'हुशार' ही धारणा अत्यंत चुकीची आहे. कारण प्रत्येकाची हुशारी ही त्याच्या परीक्षेच्या मार्कांवरूनच नाही ठरत. बऱ्याचदा अधिक टक्के मिळाले तर विज्ञान शाखा अथवा अगदीच कमी टक्के मिळाले तर कला शाखेचा मार्ग ही समजूत कुठेतरी बदलण्याची गरज आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तसंच विद्यार्थ्यांची आवडनिवडही लक्षात घ्यावी. मिळालेले गुण व ठराविक क्षेत्राची आवड यातील ठराविक क्षेत्राची आवड व जिद्द, चिकाटी यांची निवड करणं केव्हाही उत्तमच!
सायली शिंदे, भवन्स कॉलेज
उद्देश वेगवेगळे
आजच्या घडीला कोणताही अभ्यासक्रम निवडताना परीक्षा ही द्यावीच लागते. पण बोर्डाची परीक्षा ही जरा वेगळीच असते. या परीक्षेचा निकाल जाहीर होताच त्यांची बातमी सर्व ठिकाणी पसरते, म्हणून या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी खूप मेहनत घेऊन करतात. त्यातल्या-त्यात जास्त मार्क मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत, हुशार विद्यार्थी व आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक आदर्श मुलगा व मुलगी म्हणून ओळखले जाऊ यासाठी काही अभ्यास करतात. तर काही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करतात. प्रत्येकाचा हेतू जरी वेगवेगळा असला तरी अभ्यास मात्र सारखाच करावा लागतो. म्हणून या काळात विद्यार्थी खूप मेहनत घेऊन मार्क मिळवतात.
गीता गायकर, जीवनदीप कॉलेज
टक्के नव्हे धक्के
गुणांच्या स्पर्धेने शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण असतं. 'परीक्षेत चांगले टक्के, नाहीतर घराबाहेर धक्के' हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाचे ब्रीदवाक्य झालंय. पालकांच्या दबावामुळे आणि सतत बदलणाऱ्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. काही विद्यार्थी टक्के कमी पडल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे, पालक ओरडणार या भीतीने आत्महत्येचा पर्याय निवडतात. विद्यार्थी त्याच्या क्षमतेप्रमाणे अभ्यास करत असेल तर त्यामध्ये काय वाईट आहे? का त्याच्यावर एवढा दबाव आणला जातो? कालानुरुप शिक्षण विभागाने अभ्यासक्रमातसुद्धा बऱ्याच सुधारणा केल्या आहेत व अजून कराव्यात जेणेकरून विद्यार्थी दडपणाखाली येऊन काही चुकीचं पाऊल उचलणार नाहीत. करिअरच्या दृष्टिकोनाने टक्केवारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, त्यासाठी इतरांसोबत स्पर्धा न करता ती स्वत:सोबत करा.
कौस्तुभ शिंदे, यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी
शैक्षणिक प्रगती कशी कळणार?
शिक्षण विभाग किंवा बोर्ड कोणीही, कितीही प्रयत्न केले तरी निकालांमधील स्पर्धा थांबणार नाही, कारण काही झालं तरी गुणवत्ता ही दर्शवावीच लागेल मग ती टक्क्यात असो व ग्रेडमध्ये. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी कळणार? मुळात स्पर्धा करणारा विद्यार्थीच असतो. आपल्याला किती गुण मिळालेत यापेक्षा आपल्या मैत्रिणीला किती आपल्यापेक्षा जास्त किंवा कमी मिळालेत याचीच उत्कंठा जास्त असते. पण असं करताना आपण ज्या गुणांची अपेक्षा करत आहोत ते मिळवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या मेहनातीकडे का दुर्लक्ष होतं? असं करुन चालणार नाही. स्पर्धा असवी तर ती निकोप असावी, असं माझं मत आहे.
स्नेहल कोलते, एच. आर. कॉलेज
अंगभूत कौशल्य ओळखा
दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढतीय. परंतु करिअरची योजना ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असून तिची सुरुवात आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रम निवडण्यापासून, नोकरी मिळवण्यापासून आणि त्यात प्रगती करण्यापासून होते. योग्य करिअर निवडताना आणि योग्य निर्णय घेताना ते स्मार्टपणे घेणं महत्त्वाचं ठरतं. करिअरची निवड हे खरोखर वेळखाऊ काम आहे. करिअरसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड. करिअर निवडताना विचारात घेण्याजोगी आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडील कौशल्यसंच. कुटुंबातील सदस्यांशी, मित्रांशी आणि शिक्षकांशी बोलून तुमच्या कौशल्यविषयी अधिकाधिक जाणून घेणं महत्त्वाचं आहे. परंतु तसं न होता मार्क्स पाहिले जातात हे मला चुकीचं वाटतं. कारण आपल्यातील अंगीभूत कौशल्य न वापरण्याजोगा अभ्यासक्रम शिकताना, अभ्यासात यशस्वी होण्याच्या आणि व्यवसायिक प्रगती साधण्याच्या संधी कमी होतात.
अरुणा रसाळ, बिर्ला कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट